कोल्हापूर Kolhapur Sugarcane Nursery : पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उसाचं उत्पन्न घेतलं जातं. मात्र यंदाच्या आसमानी संकटामुळं ऊस उत्पादनात घट झाली आहे. तसेच राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनामुळं यंदाचा हंगाम देखील पुढे गेल्याने, उसाची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकामध्ये रोपाच्या मागणीत घट झाली होती. ज्या रोपवाटिकांकडे रोपे शिल्लक होती. त्याची वाढ प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने ही रोपे अक्षरशः चारा म्हणून वापरावी लागली होती. ज्या रोपवाटिका नुकत्याच नव्याने सुरू झाल्या होत्या त्यांना याचा मोठा फटका बसला. मात्र आता दोन महिन्यांच्या मंदीनंतर ऊस रोपवाटिकांमध्ये लगभग सुरू झाली आहे. ऊस हंगामामुळं नवीन ऊस लागवडीसाठी नवीन रोपांची मागणी वाढू लागली आहे.
रोप लावणीला पसंती : नोव्हेंबरपासून ऊस हंगाम जोमानं सुरू झाल्यानं, ऊस तोडणीनंतर रिकामी झालेल्या शेतात शेतकऱ्यांनी रोप लावणीला पसंती दिल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश मधून नवीन वाणांची मागणी होत असून यामध्ये रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांना आवश्यक ती रोपे पुरवण्यात कमतरता भासू लागली आहे. कांडी लावण केल्यानंतर थंडीमुळं उसाची वाढ कमी होते. यामुळं तयार रोपांची लागवड केल्यास उसाचा कालावधी कमी होत असल्यानं शेतकरी रोप लावणीला प्राधान्य देत आहेत.
या जातीचा वाणांना मोठी मागणी : राज्यात ८६०३२, २६५ ऊस वाण ही गेल्या दोन वर्षांपर्यंत सर्वाधिक विक्री होणारे वाण होते. मात्र आता शेतकरी नवीन आणि वैविध्यपूर्ण वाणांना मागणी करत आहेत. यामध्ये नव्याने विकसित केलेल्या ५०१२ किंमत ४ रुपये, १८१२१ किंमत २रुपये ५० पैसे, २६५ किंमत २रुपये ५० पैसे, १३३७४ किंमत ३ रुपये ५० पैसे, १३४३६ किंमत ४ रुपये प्रति रोपटे या वाणांना राज्यात मागणी आहे. तर मध्य प्रदेशात ८००५ किंमत २ रुपये आणि गुजरातमध्ये २६५ रुपये २ रुपये ५० पैसे या वाणाला अधिक मागणी आहे. तर एक एकरसाठी साधारण ६००० रोपे लागतात. तर सर्व खर्च वजा करून रोपवाटिका चालकाना २५००० ते ३०००० रुपये भरघोस नफा मिळतो.
ऊस रोपवाटिका चालकानमध्ये समाधान : कोल्हापुरात ऊस रोप वाटिका चालवणारे चालक समाधान व्यक्त करत आहे. रोपवाटिका चालक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रसंगी जादा रक्कम देऊन संबंधित जातीचा ऊस बियाणांसाठी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. यामुळं कोल्हापूर डिसेंबरपर्यंतचा काळ रोपवाटिकांची परीक्षा पाहणारा ठरला आहे.
हेही वाचा -