कोल्हापूर - जिल्ह्यातील दोन आमदारांनंतर आता खासदारांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलालासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दरम्यान, खासदारांच्या कुटुंबातील लोकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले असून सर्वांना अलगलीकरणात ठेवले असल्याची माहिती मिळत आहे. स्वतः खासदार संजय मंडलिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली असून प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन मंडलिक यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 19 हजारांवर पोहोचली असून मृतांची संख्या 563 वर पोहोचली आहे. दररोजच जिल्ह्यात 500 हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असून जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात एकूण 19 हजार 81 रुग्णांपैकी 10 हजार 847 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 7 हजार 671 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.