कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे रुग्ण वाढत चालले आहेत, तसतशी ऑक्सिजनचीसुद्धा मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. जिल्ह्यात तब्बल साडेचार हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 हजार 116 रुग्ण सध्या ऑक्सिजनवर आहेत. त्यांना आज 32.4 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरण्यात आला तर 38 मेट्रिक टनाहून अधिक ऑक्सिजनची उद्या गरज असणार आहे.
दररोजचा शिल्लक साठा आणि होणारा पुरवठा नियंत्रणात असल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असल्याचे चित्र सध्यातरी कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. पाहुयात 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट.
जिल्ह्यात एकूण रुग्णालय आणि किती रुग्णांना ऑक्सिजनची गरज?
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 77 कोव्हिड रुग्णालये आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 555 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशी 1 हजार 938 ग्रामीण भागातील रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 716 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. उरलेले 1 हजार 901 रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या 1 हजार 901 रुग्णांपैकी 1 हजार 116 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत अशी प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
हेही वाचा-कोरोना वॉर्डात मोठ्याने बोलू नका म्हणणाऱ्या डॉक्टरावर नातेवाईकाचा हल्ला
जिल्ह्याला ऑक्सिजनची असणारी गरज, पुरवठा आणि एकूण साठ्यावर एक नजर-
मिळालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण 77 कोव्हिड रुग्णालयांमध्ये मंगळवारीपर्यंत 34.16 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा होता. आज यामध्ये आणखी 22.77 मेट्रिक टन ऑक्सिजनचा कंपनीकडून पुरवठा करण्यात आला. त्यातील 32.4 मेट्रिक टन ऑक्सिजन आज वापरण्यात आला आहे. आज सायंकाळी अखेर 23.8 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा विविध रुग्णालयांमध्ये शिल्लक आहे. हीच गरज ओळखून उद्या सुद्धा जवळपास 38 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी पुरेसा ऑक्सिजन साठा आहे. वेळ पडल्यास पुढील नियोजनसुद्धा प्रशासनाने तयार ठेवले असल्याची माहिती मिळते.
गेल्या 48 तासात 56 जणांचे बळी-
एकीकडे सर्वच रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा पाहायला मिळत आहे. मात्र मागील 48 तासात कोल्हापूरात सर्वाधिक मृतांचा आकडा नोंदवण्यात आला आहे. 19 एप्रिल 2021 रोजी तब्बल 34 जणांचा मृत्यू तर मंगळवारी 20 एप्रिलला 22 जणांचा मृत्यू झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत असलेल्या मृत्यूदराबाबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी डेथ ऑडिट करण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-राज्यात दोन महिने आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा; पंतप्रधानांना काँग्रेस नेत्याचे पत्र
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2021 पर्यंत तीन लाखापेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात कोल्हापूर जिल्हा लसीकरणाबाबत प्रथम स्थानी आहे.