कोल्हापूर - गेल्या 24 तासांहून अधिक वेळ कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर राधानगरी धरण 60 टक्के भरले आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगडमध्ये अतिवृष्टी सुरू असून अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे.
गगनबावडा तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 159 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज दुपारी 12 पर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, राजारामपुरी चौक, शाहूपुरी या ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नद्या धोक्याची पातळी गाठू शकतील अशी परिस्थिती आहे.