कोल्हापूर - युतीच्या आणि आघाडीच्या सुद्धा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होणार आहे. सेना भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ २४ मार्चला फोडण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस- राष्ट्रवादीदेखील प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातूनच करणार असून युतीच्या सभेपेक्षा ही सभा विराट असेल, असे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या प्रचाराला २४ मार्चला सुरुवात होणार आहे. युतीची पहिली जाहीर सभा कोल्हापूर येथून होणार आहे. या सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील मात्तबर नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्याला प्रत्युत्तरादाखल आघाडीनेही कोल्हापुरातूनच प्रचाराचा शुभारंभ करण्याचे नियोजन सुरू केले असून प्रियंका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कोल्हापूरातील राष्ट्रवादीच्या नाराज नगरसेवकांची समजूत काढण्यात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ या दोघांनाही यश आले असून सर्व नगरसेवक एकसंघपणाने प्रचारात उतरणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.