कोल्हापूर - ज्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ सफाई कर्मचारी म्हणून काम केलं, त्याच ग्रामपंचायतीमध्ये आता सदस्य म्हणून मतदारांनी एका आजीबाईंना पाठवले आहे. कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी गावातील नागरिकांनी हे शक्य करून दाखवले असून द्रौपदी रामचंद्र सोनूले असे या आजीबाईंचे नाव आहे. निवडून येताच काय म्हंटलं आहे आजीबाईंनी पाहुयात.
गडमुडशिंगी गावचा आदर्श -
करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी या गावात गेल्या अनेक वर्षांपासून द्रौपदी सोनूले सफाई कर्मचारी म्हणून काम करत आल्या आहेत. गावातील परिसर झाडून काढण्यापासून गटर साफ करण्यापर्यंत सगळी कामं त्या करत होत्या. त्यांनी गावासाठी दिलेल्या या योगदानाबद्दलच माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी द्रौपदी सोनूले यांना ग्रामपंचायत सदस्य बनवायचं ठरवलं. आपल्या पॅनेल मधील सर्वांशी चर्चा करून त्यांना तिकीट दिलं आणि आजीबाई मोठ्या मताधिक्याने निवडून सुद्धा आल्या. ग्रामपंचायतमधील कर्मचारी वर्षानुवर्षे गावाची सेवा करत असतात. मात्र त्यांना सदस्य बनविल्याचे आजपर्यंत कोल्हापुरात उदाहरण पाहायला मिळाले नव्हते. मात्र गडमुडशिंगी गावातील नागरिकांनी एका कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत सदस्य बनवून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे.
सफाई कर्मचारी आजी बनल्या ग्रामपंचायत सदस्या आता अभिमानाने सांगते ग्रामपंचायत सदस्याची नात - आजी गेल्या 40 वर्षांपासून गावाची सेवा करत आली आहे. कधीही वाटलं नव्हतं ती पुढे जाऊन राजकारणात सुद्धा जाईल आणि सफाई कर्मचाऱ्यावरून ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बनेल. मात्र गावातल्या नागरिकांनी तिला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. आधी आजी ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारी आहे सांगायला लागायचे आता मात्र ग्रामपंचायत सदस्याची नात असल्याचा अभिमान असल्याचेही द्रौपदी सोनूले यांची नात सायली सोनूले हिने म्हटले आहे.
गावात काम करायची अजूनही इच्छा - सगळे म्हणतात आता ग्रामपंचायत सदस्य झाल्यामुळे खुर्चीवर बसायचं. मात्र अनेक वर्षे सफाई कर्मचारी म्हणून काम केलं. अजूनही गावात स्वच्छतेबाबत काम करायची इच्छा असल्याचे द्रौपदी सोनूले यांनी म्हटले आहे.
महिना 60 रुपये पगार असल्यापासून ग्रामपंचायतीत कार्यरत - द्रौपदी सोनूले या 40 वर्षांपासून गावात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. महिना 60 रुपयेच्या आसपास सोनूले यांना पगार होता. अनेक वर्षांपासून त्यांनी गावाची विनातक्रार सेवा केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनीच आता मतांच्या रूपाने केलेल्या सेवेची परतफेड केली आहे.
माजी सरपंचांच्या पत्नीचा केला पराभव - द्रौपदी सोनूले यांनी गावातील एका मोठ्या पुढाऱ्याच्या म्हणजेच माजी सरपंचांच्या पत्नीचा पराभव केला आहे. त्यामुळे त्याचे सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाय गावकऱ्यांनी सुद्धा नेता न बघता ज्यांनी गावाची इतकी वर्षे सेवा केली आहे त्याला ही संधी दिली आहे. त्यामुळे गड मुडशिंगी गावाची संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.