कोल्हापूर - इकडे शेतकरी अडचणीत आहेत आणि तिकडे त्याच शेतकऱ्यांची पोरं सीमेवर धारातीर्थी पडत असतील तर ५६ इंच छातीचा काय उपयोग, असा संतप्त सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ते आज शनिवार कोल्हापुरात आयोजित पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, नुसते निषेध आणि खलिते पाठवून ते काय गप्प बसले नाहीत. आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असून त्याचा उपयोग काय, त्यांच्यावर हल्ला करूनच याचे उत्तर देण्याची अपेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. सैन्याच्या मुद्द्यावर राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचेही मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नामुळे २ रुपये का असेना साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता साखर कारखानदारांनी पैसे देण्यास टाळाटाळ करू नये. अन्यथा पुन्हा एकदा साखर आयुक्तांना जाब विचारला जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. शिवाय ज्या ऊस उत्पादक कारखानदारांना पूर्ण एफआरपी देणे शक्य नाही, त्यांनी उर्वरित पैशाची साखर द्यावी. या मागणीवर सुद्धा आपण ठाम असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.