कोल्हापूर - तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार असून महाराष्ट्रातील 14 लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाचा सुद्धा समावेश आहे. जिल्ह्यातील 4 हजार मतदान केंद्रावर 35 लाखाहुन अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 200 पेक्षा अधिक मतदान केंद्र संवेदनशील असून 6500 पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सूचना पत्रक लावण्यात आली आहेत. मतदान केंद्रात कोणतेही गैरकृत्य होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात यंदा पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा
47 - कोल्हापूर लोकसभा मतदार संघ
मतदान आकडेवारी
एकूण मतदान- 18,68,235
महिला- 9,13,433
पुरुष- 9,54,788
इतर- 14
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात येणारे विधानसभा मतदारसंघ
1) चंदगड 2) राधानगरी 3) कागल 4) कोल्हापूर दक्षिण 5) करवीर 6) कोल्हापूर उत्तर
कोल्हापूर मतदार संघात दुरंगी लढत होत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून खासदार धनंजय महाडिक हे आहेत.
48 - हातकणंगले लोकसभा मतदार संघ
एकूण मतदान-17,65,744
महिला- 8,53,596
पुरुष-9,12,087
इतर-61
हातकणंगले लोकसभा मतदार संघात येणारे विधानसभा मतदार संघ
1) शाहूवाडी 2) हातकणंगले 3) इचलकरंजी 4) शिरोळ, 5) इस्लामपूर 6) शिराळा
हातकणंगले मतदार संघात सुद्धा दुरंगी लढत होत आहे. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून धैर्यशील माने हे रिंगणात आहेत.
दोन्ही मतदार संघात उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत असली तरी मतदानाच्या माध्यमातून मतदारराजा कोणाला कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.