कोल्हापूर - महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मॅसेज सध्या व्हायरल होत आहेत. आम आदमी पक्षाच्या वतीने या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशीची मागणी करत भ्रष्टाचाराची दहीहंडी आज (मंगळवारी) मनपाच्या प्रवेशद्वारावर फोडली. महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार थांबवावा अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला.
मेसेज व्हायरल -
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हॉट्सअप ग्रुप वरील संदेश व्हायरल होत आहे. काम देताना जे ठरले ते करायचं, जास्त लांबड लावायची नाही. असा एक संदेश या ग्रुपवर व्हायरल होत आहेत. 18 टक्के कमिशन मिळाल्याशिवाय काम करायचे नाही. असे संभाषण या ग्रुपवर झाल्याची चर्चा आहे. या टक्केवारी पद्धतीचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेसमोर महापालिकेच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी हे आंदोलन केले. दुपारी बाराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. टक्केवारीत सामील असलेल्या कारभाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा - होय, मीच कार्यकर्त्यांना दहिहंडी साजरी करण्यास सांगितले -राज ठाकरे
सीबीआय चौकशी करा -
जनतेचा पैसा लुबाडून ढपला संस्कृती वाढवून शहराचे नाव बदनाम केले जात आहे. अशा प्रवृत्तीला वेळेस आळा घातला गेला नाही तर कोल्हापुरात एकही प्रकल्प पूर्णत्त्वास जाणार नाही. अनेक कामात टक्केवारीच्या घोळामुळे काम अर्धवट राहिले आहेत, असा आरोपदेखील आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केले. संबंधित महानगरपालिकेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. तसेच या भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणीही केली असल्याचे संदीप देसाई यांनी सांगितले.