कोल्हापूर - शासनाच्या 31 मे च्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. तसेच लॉकडाऊन कडक करण्याबाबत वेगळे आदेश दिले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. आवश्यकतेनुसार मार्केट यार्डमध्ये मुंबई तसेच नवी मुंबई येथे जाऊन आलेल्या चालक आणि वाहकांच्या स्वॅब तपासणीचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यात येत्या सोमवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. याबाबत त्यांनी ही केवळ अफवा असून 31 मे च्या आदेशानुसारच लॉकडाऊन सुरू राहणार असल्याची माहिती दिली.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडील 31 मे च्या आदेशाप्रमाणे लॉकडाऊन बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. या कालावधीत महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे बंदी आदेशाचे पालन करणे सर्व नागरिकांना बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये विशेषत: शहर परिसरामध्ये लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत संभ्रमता निर्माण झाली आहे. या बंदी आदेशाप्रमाणे रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत लोकांच्या हालचाली त्याप्रमाणे वाहनांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा आणि इतर आस्थापना यासुद्धा लॉकडाऊनच्या कालावधीत आता सुरू आहेत. फक्त त्यांच्या कालावधीमध्ये मर्यादा घातलेल्या आहेत. काही ठिकाणी रेस्टॉरंट किंवा काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. पार्सल सेवा देण्याऐवजी दुकाने उघडी ठेऊन लोकांना खाद्यपदार्थ देण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे, अशा काही तक्रारी येत आहेत.
31 मे च्या आदेशाप्रमाणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु असून, यात कोणताही बदल केलेला नाही. तसेच लॉकडाऊन कडक करण्याबाबत वेगळे आदेश दिलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले. जिल्ह्यामधील विविध कोरोना पॉझिटिव्ह व कोरोनाबाधित क्षेत्र आहेत. याठिकाणी बंदीची अंमलबजावणी केली जाते. याच अनुषंगाने मागील दोन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये विशेषत: शहरांमधील काही भागात आणि ग्रामीण भागामधील काही ठिकाणे आहेत. या ठिकाणी जास्ती लक्ष देणे आवश्यक असल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे.