कोल्हापूर - गेल्या वर्षी आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा महापूर झाला. महापुराचे चित्र डोळ्यासमोर आले तरीही अंगावर काटा येईल, अशी त्यावेळची परिस्थिती बनली होती. यामध्ये कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांना महाप्रलयाचा सर्वाधिक फटका बसला होता. आजही महापुराच्या त्या आठवणी ताज्या आहेत. एकही घर असं नव्हतं ज्या घरात 7 ते 8 फूट पाणी नव्हतं. शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली. घरात होतं नव्हतं ते साहित्य पाण्यात बुडालं, तर अनेकांची जनावरंसुद्धा डोळ्यादेखत पुरातून वाहून गेली.
बचावकार्याच्या प्रतीक्षेत सर्वजण होती. प्रत्येकजण त्यावेळी नुकसान काय झालं? यापेक्षा आपला जीव कसा वाचवायचा या धडपडीत होता. रॉकेलचे कॅन, टायर ट्यूब, गुळाच्या काहिली अशा अनेक गोष्टींचा वापर करत गावकऱ्यांनी गावातील उंच ठिकाणी जाऊन स्वतःचे जीव वाचवले. कोल्हापुरात यावर्षी पुन्हा महापूर येतो की काय? अशी भीती अनेकजण व्यक्त करत असून अनेकांनी गतवर्षीच्या त्या कटू आठवणी ताज्या केल्या.
...अन् गावातील आंबे गल्लीचा घेतला आधार -
महापुरावेळी गावात केवळ आंबे गल्लीमध्ये पुराचे पाणी जास्त नव्हते. त्यामुळे अनेकांनी त्या गल्लीचा आसरा घेतला. प्रत्येकजण जगण्यासाठी धडपडत होते. बचाव कार्याची वाट पाहत होते. सगळे संसार उद्ध्वस्त झाले होते. खाण्यासाठीही काही उपलब्ध नव्हते. दोन दिवसांनी गावात एनडीआरएफ दाखल झाले. महिला आणि लहान मुलांना सुरुवातीला गावातून बाहेर काढायला सुरुवात झाली. पण प्रत्येकाला आपलं बुडालेलं घर मागे सोडून सुरक्षित ठिकाणी जात असताना ज्या वेदना होत होत्या त्या अधिकच भयानक आणि सहन न होण्यासारख्या होत्या.
गावात लाईट सुद्धा नव्हती -
संपूर्ण गाव पाण्याखाली, वरून धो धो कोसळणारा पाऊस आणि सर्वत्र अंधार, अशी त्यावेळची परिस्थिती. सर्वांचे मोबाईल बंद झाले होते. त्यामुळे तत्काळ मदतीसाठीसुद्धा कोणाला बोलवू शकत नव्हते.
शेकडो जनावरं वाहून गेली; वाचलेली जनावरं 6 दिवस उपाशी -
महापुरात आंबेवाडी आणि चिखली या दोन गावातीलच जवळपास 200 हून अधिक जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेकांनी त्यांना वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी वाढत गेली. शेवटी स्वतःचा जीव सुद्धा तितकाच महत्वाचा होता. त्यामुळे काळजावर दगड ठेवत हातातील दावी सोडून द्यायला लागल्या. काही वाचलेल्या जनावरांना नागरिकांनी एकाच गल्लीत बांधून ठेवलं होतं. मात्र, त्यांना 5 ते 6 दिवस काहीही खाद्य मिळालं नाही.
आयुष्यभर लक्षात राहतील असे ते 15 दिवस -
महापुरानंतरची परिस्थिती अतिशय भयावह अशी होती. आजही पाऊस म्हंटलं तरी 2019 चा महाप्रलय डोळ्यासमोर येतो. आयुष्यभर कमावलेले सगळं वाहून गेलं. काहीही शिल्लक राहिले नाही. अगदी शून्यातून सर्वकाही पुन्हा सुरू करावं लागलं. पुढचे काही दिवस झोपेतही महापूर डोळ्यासमोर यायचा असे इथले नागरिक सांगतात.
लाखोंचे नुकसान. मात्र, मदत 10 हजारांची -
गेल्या वर्षीच्या महापुरात प्रत्येकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सगळं काही नव्याने सुरू करावे लागले. शासनाकडून केवळ 10 हजार रुपयांची मदत मिळाल्याचे नागरिक सांगतात. खरंतर शासनाकडून देता येईल तितकी मदत कमी पडेल इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्याचे नुकसान झाले होते. कारण प्रत्येक घरात नवी सुरुवात करावी लागणार होती. आयुष्यभराची मिळकत डोळ्यादेखत वाहून गेली होती. मात्र, या सर्वात शासनाकडून 10 हजार मिळाले असले तरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी कोल्हापूरला जीवनावश्यक साहित्यांची मदत पाठवल्याचे सुद्धा अनेकजण सांगत असतात.