कोल्हापूर Swabhimani Farmers Association : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी गेल्या आठ दिवसांपासून ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये मिळावा या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. नियोजित दर दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. मात्र, असं असताना देखील साखर कारखाने, सत्ताधारी आणि विरोधक कोणीच याची दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काल (मंगळवारी) शिरोळ येथे गोडावत जागरी कारखान्यात ऊसाची वाहतूक सुरू असताना निमशिरगाव येथे ऊसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. घटनेनंतर राजू शेट्टी यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, असं आवाहन केलं आहे. (Raju Shetti Protest for Sugar cane)
राजू शेट्टी 522 किमी चालणार : मागील ऊस हंगामातील दुसरा हप्ता 400 रुपये मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेल्या आठ दिवसांपासून आक्रोश पदयात्रा काढत आहेत. ही पदयात्रा 17 ऑक्टोबर पासून सुरू असून एकूण 22 दिवसात ती कोल्हापूर जिल्ह्यातील 37 कारखान्यांवर जात आहे. राजू शेट्टी स्वतः तब्बल 522 किलोमीटर चालत असून गेल्या वर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, या आंदोलनाची दखल कारखानदार, सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कोणीही घेतली नाही. अखेर संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल गोडावत जॉगरी कारखान्याचे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवून दिला.
अन्यथा उद्रेकाची शक्यता: शेतकरी कडक उन्हात रक्तबंबाळ पायाने हजारो किलोमीटर चालत आहेत. मात्र, याची दखल कोणीही घेतली अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच राजकारण म्हणून तरी विरोधी पक्षाने शेतकऱ्यांची बाजू घ्यायला हवी होती. परंतु, विरोधी पक्षांच्या नेत्यांचेही साखर कारखाने आहेत. यामुळे विरोधी पक्ष देखील या आंदोलनाची दखल घेत नाहीये. सत्ताधारी, विरोधक आणि साखर कारखानदार या सर्वांना मिळून शेतकऱ्यांचे पैसे बुडवायचे आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. तसेच शेतकऱ्यांनी अजूनही संयमाने आंदोलन करण्याचे राजू शेट्टी यांनी आवाहन केले. सरकार आणि कारखानदारांनी तात्काळ हा प्रश्न सोडवावा. अन्यथा केव्हाही आंदोलनाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कशी आहे आक्रोश पदयात्रा? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून 22 व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 22 दिवस हे आत्मक्लेष आंदोलन चालणार आहे. आंदोलनाची सुरुवात 17 ऑक्टोबर पासून शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखाना येथून झाली. पुढे गुरूदत्त, जवाहर, शाहू, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, संताजी घोरपडे, बिद्री, भोगावती, कुंभी कासारी, दालमिया, वारणा, बांबवडे, चिखली, निनाईदेवी, वाटेगाव, कृष्णा, राजाराम बापू, जी डी बापू लाड, वाळवा हुतात्मा, सांगली सहकारी, सर्वोदय, शरद, पंचगंगा साखर कारखाना करत तब्बल 522 किलोमीटर अंतर चालून ही यात्रा 07 नोव्हेंबर रोजी थेट जयसिंगपूर येथील 22 व्या ऊस परिषदेला पोहोचणार आहे.
हेही वाचा:
- Supriya Sule Criticized CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातील भाषण काल्पनिक - सुप्रिया सुळे
- Kirit Somayya : किरीट सोमैयांच्या वकिलांची न्यायालयात उडाली भंबेरी, याचिकेत सुधारणा करण्याची उच्च न्यायालयाची परवानगी
- Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या मतदारसंघातील गाठी भेटी स्वतःसाठी नव्हे तर मुलीसाठी... शिंदेंची स्पष्टोक्ती