जालना - रस्त्यालगत असलेल्या घरात कंटनेर घुसल्याची घटना जालना तालुक्यातील नावा गावाजवळ घडली आहे. या अपघातात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिंदखेड राजा ते जालना महामार्गावर असलेल्या नाव्हाशिवारात भरधाव कंटेनर शेत वस्तीतील घरात घुसला. या अपघातात दोन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला.
आज दिनांक 19 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सिंदखेड राजावरून जालन्याकडे एक कंटेनर जात होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेख कासम भाई यांच्या घरासमोर खेळत असलेल्या त्यांच्या 2 नाती छाबडी सलीम शेख (वय पाच वर्ष) आणि सायली सलीम शेख (वय सात वर्ष) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. मूळच्या जालना तालुक्यातीलच धारकल्याण येथील रहिवासी असलेल्या शेख परिवाराच्या या दोन्ही मुली आज त्यांच्या आजोळी म्हणजे शेख कासम भाई यांच्याकडे आल्या होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघात झाल्यानंतर कंटेनरचा चालक आणि त्याचा सहायक फरार झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवरतन बहुरे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक संजय लोहकरे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी घटनास्थळावर भेट देऊन अपघाताची माहिती घेतली आहे.