जालना - लालबावटा संघटनेच्या मेळाव्यासाठी दुचाकीवरुन जात असताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी कुंभार पिंपळगावजवळ ही घटना घडली. भागवत प्रल्हाद हरबक (वय 27) आणि मारिया विनोद लालझरे (वय 32) अशी मृतांची नावे आहेत. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे.
काही महिन्यांपूर्वी हे दोघेही हरवल्याच्या तक्रारी वाळुंज आणि जालना तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपास करून 12 एप्रिलला या दोघांनाही गुजरात येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे दोघेही चापडगाव येथील आपापल्या घरी राहत होते. बुधवारी दोघे लाल बावटा संघटनेच्या मेळाव्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.
घातपाताचा आरोप -
मृत मारिया या विधवा आहेत. त्यांचे भागवत यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारियाच्या सासरच्यांनीच दोघांना ट्रॅक्टरखाली चिरडून मारल्याचा आरोप भागवत यांच्या पत्नीने केला आहे. अपघातानंतर या दोघांनाही जालना येथील शासकीय रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी भागवत याने आई सीताबाईंना अपघात घडवल्याचे सांगितले, असा दावा भागवत याची पत्नी राधा हिने केला आहे. राधा यांनी अंबड पोलीस ठाण्यात लालझरे पिता-पुत्राविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला.