जालना - राज्य सरकारी गट क्रमांक-डच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काल (दि. 27)पासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी काळ्याफिती लावल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. उद्या तिसऱ्या दिवशी एक दिवसाचा लाक्षणिक संपही पुकारण्यात आला आहे.
'या' आहेत प्रमुख मागण्या
14 जानेवारी 2016चा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, सर्व शासकीय खात्यातील वर्ग 4ची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, महसूल विभागातील वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तलाठी वर्ग तीन पदावर पदोन्नती देण्यात यावी, कोतवाल यांना वर्ग चारचा दर्जा देण्यात यावा, सेवानिवृत्त कोतवालांना सेवानिवृत्ती योजना लागू करावी. नगरपालिका व नगरपंचायतमधील १५ वर्षापासून रिक्त असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना वर्ग 4च्या जागा सरळसेवेने तातडीने भरण्यात याव्यात, ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करावे, गृह खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना अपघात व मोठ्या आजारांसाठी शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांप्रमाणेच सर्व खात्यातील गट-ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
जिल्ह्यातील 750 कर्मचाऱ्यांचा समावेश
जालना जिल्ह्यातील नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, आदी सर्व शासकीय कार्यालयातील गट-ड, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. जिल्ह्यामध्ये या श्रेणीचे 700 कर्मचारी कार्यरत आहेत. आज आर. एम. शिराळे, एम. जे. वाहुळकर, अजिस डांगे, छाया कुलकर्णी, विजय आडे, रवींद्र पवार, लक्ष्मण बावस्कर, कल्पना कारके आदींची उपस्थिती होती.