जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे अनेकजण आहे त्या ठिकाणी अडकले आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यातून आलेले लाखो परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. अशाच अडकलेल्या 1 हजार 464 कामागारांसाठी आज (दि. 12 मे) सायंकाळी 5 वाजता जालना रेल्वे स्थानकातून श्रमिक विशेष रेल्वे सुटणार आहे. जालन्यातून जाणारी ही दुसरी श्रमिक विशेष रेल्वे असून यापूर्वी रविवारी (दि.10 मे) उत्तरप्रदेशसाठी धावली होती.
यावेळी कामगारांचा कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ नये यासाठी औरंगाबाद रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संंस्थेत नियोजन सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील कामगारांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन मिळालेले पास ग्राह्य धरून याच कामगारांना रेल्वेचे तिकीट मिळणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, केशव कानपुडे, आयटीआयमध्ये ठाण मांडून बसले आहेत.
यावेळी तहसीलदार यांनी सर्वांना सुचना दिल्या. ते म्हणाले, आजची रेल्वे ही फक्त उत्तर प्रदेशसाठी जाणार आहे. ज्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर पाससाठी अर्ज केला आहे. सर्वप्रथम त्यांना तिकीट दिले जाणार आहे. जर काही तिकिटे शिल्लक राहिली तर उत्तर प्रदेशला जाणाऱ्या उर्वरीत प्रवाशांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा - जालन्यातून उत्तर प्रदेशकडे 'श्रमिक विशेष एक्सप्रेस' रवाना... १,२०० मजूर परतणार घरी