जालना - कोरोनाशी लढा देताना आपण आता तिसऱ्या टप्प्यात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयीचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन उपाययोजना केल्या म्हणून आपल्याकडे याची जास्त बाधा झाली नाही. मृत्यू दरही कमी आहे. जनतेनेदेखील घरात राहून चांगला प्रतिसाद दिला. त्यासोबत राज्य शासनानेदेखील केंद्र शासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे हे सर्व शक्य झाले, असे मत केंद्रीय मंत्री तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी आज व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अशोक पांगारकर यांच्या वतीने गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आला.
भाजपचे नगरसेवक अशोक पांगारकर यांच्यावतीने सुरू झालेल्या या उपक्रमाचा शुभारंभ निळकंठ नगर येथील सभागृहात आज प्रतिनिधिक स्वरुपात खासदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक अंतर पाळून प्रातिनिधिक एकवीस गरजूंना या कीटचे वाटप करण्यात आले. उर्वरित गरजूंना त्यांच्या घरपोच हे साहित्य देण्यात येणार आहे. आजच्या शुभारंभावेळी नगरसेवक अशोक पांगारकर, विजय पांगारकर, सिद्धिविनायक मुळे, राजेश राऊत आदींची उपस्थिती होती.