जालना - शहरात आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास १० मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, या पावसात रस्तेही भिजले नाहीत. परंतु, त्यानंतर पुन्हा साडेपाच वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि यावेळी चांगल्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तसेच उगवलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
तब्बल एक महिन्यापासून जालना शहरात पावसाची उघडीप होती. त्यामुळे भर पावसाळ्यात उन्हाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाणीटंचाई तर होतीच. त्याचसोबत उकाड्यानेही नागरिकांचे हाल होत होते. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांचेही डोळे आभाळाकडे लागले होते. पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते.
दरम्यान, आज ४ वाजेच्या सुमारास १० मिनिट रिमझिम पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा आकाश निरभ्र झाले. मात्र, साडेपाचच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांची सुटका झाली. तसेच आज झालेला हा पाऊस समाधानकारक जरी नसला तरी पिकांना जीवदान देण्यासाठी मात्र निश्चितच फलदायी ठरणार आहे.