जालना - कचेरी रोडवर असलेल्या उर्दू हायस्कूल शाळेसमोर दोन पोलीस पहारा देत होते. अचानक झाडावरून लांबलचक साप टपकला आणि पाहता-पाहता दुचाकीवर जाऊन बसला. सुदैवाने पोलीस यातून बचावले.
दोन फूट लांबीचा साप
उर्दू शाळेच्या प्रवेशद्वारावरच हे कदीम जालन्याचे पोलीस कर्मचारी बसलेले होते. बाजूलाच गुलमोहराचेदेखील एक झाड आहे आणि या गुलमोहराच्या झाडावरून एक लांबलचक दोन फुटाचा साप पोलिसांच्या समोरच पडला. काय पडले आहे हे पाहेपर्यंत हा साप बाजूलाच असलेल्या दुचाकीवर जाऊन बसला. साप काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तो दिसेनासा झाला. अत्यंत चपळ असलेला हा साप या दुचाकीच्या फिल्टरमध्ये जाऊन बसला. शेवटी सर्पमित्रांनी ही दुचाकी उघडून त्यामधील फिल्टरमध्ये बसलेल्या सापाला बाहेर काढले. बाहेर काढल्याबरोबर क्षणार्धात तो गायब झाला. मात्र तिथे असलेल्या दोन-तीन सर्पमित्रांनी त्याला पकडले आणि डब्यामध्ये बंद केले. दोन फूट लांबीचा अत्यंत चपळ आणि हिरव्या रंगाचा हा साप विषारी असल्याचेही या सर्पमित्रांनी सांगितले.
नशीब बलवत्तर
ज्या झाडाखाली हे पोलीस बसलेले होते, त्या झाडाची पाने सध्या पाणगळतीमुळे गळून पडली आहेत. फक्त बारीक-बारीक फांद्याच राहिल्या आहेत. या फांद्यांवर अशा प्रकारचा साप ओळखायलाही येत नाही. अचानक डोळ्यासमोर पडलेल्या या सापामुळे या पोलिसांचेदेखील धाबे दणाणले होते. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून हा साप अंगावर न पडता त्यांच्या डोळ्यासमोर आणि जवळच पडला.