जालना - जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील जुई आणि धामना या दोन मध्यम प्रकल्पां व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीदेखील पेरण्या सारखा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लवकरच पाऊस आला नाही तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
जालना जिल्ह्यात आत्तापर्यंत 222 मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते मात्र केवळ 138 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. भोकरदन तालुक्यात 235 मिलिमीटर एवढा अपेक्षित असलेला पाऊस पूर्ण झाला आहे. त्यामुळे या भागात असलेले जुई आणि धामना हे दोन्ही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. धामणा धरणामध्ये 10.72 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. त्यापैकी 8.5 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त जलसाठा आहे. जुई धरणदेखील पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून सध्या त्यामध्ये सहा दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा आहे. भोकरदन तालुका वगळता इतर अन्य तालुक्यांत अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या नाही. तसेच जेथे झाल्या तेथे दोन दिवसांत पाऊस आला नाही. तर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. एक समाधानाची बाब म्हणजे मागील वर्षी याच दिवसात केवळ 23 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली होती. ती वाढून यावर्षी 138 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जालना जिल्ह्यात सात मध्यम तर 57 लघु प्रकल्प आहेत या एकूण 64 प्रकल्पांपैकी फक्त दोनच प्रकल्पांमध्ये जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्प कोरडेठाक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता आजही कायम आहे.