बदनापूर (जालना) - ऑनलाइनच्या माध्यमातून पाच ग्राहकांना दोन लाख 5380 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी जालना सायबर पोलिसांनी चौकशी करत या ग्राहकांच्या खात्यातून गायब झालेली रक्कम परत मिळवून दिली आहे.
काय आहे प्रकार?
'मी भारतीय स्टेट बँकेतून (एसबीआय) बँकेतून बोलत आहे. तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायची विंनती आलेली आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पाठवा', असे म्हणत विविध ग्राहकांच्या बँक खात्यातून २ लाख ५३८० रुपये डेबिट केल्याच्या तक्रारी जालना सायबर क्राईम पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. यानंतर पोलिसांनी ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांचा शोध घेत खात्यातुन गायब झालेले पैसे ५ ग्राहकांना मिळवून दिले.
ग्राहकांच्या तक्रारी -
जालना शहरातील एजाज अहेमद खान यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, त्यांना एक कॉल आला व समोरच्या व्यक्तीने मी एसबीआय बँकेतून बोलत आहे. तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायची विंनती प्राप्त झाली आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पाठवा. यानंतर त्यांनी आलेला ओटीपी पाठवला. मात्र, यानंतर त्यांच्या बँक खात्यातुन ३३ हजार ९६८ रुपये ट्रान्सफर झाले. तर प्राजक्ता कुलकर्णी यांनी इंटरनेटवरील कस्टमर केअर नंबरवर फोन करून डेबिट कार्ड व ओटीपी दिल्याने त्यांची १९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक झाली. तसेच मदन बोरुडे यांची ६२ हजार, निवास फटिंग ४० हजार आणि संदीप भालमोडे यांची ४९ हजार ९८१ रुपयांनी फसवणूक झाली, या तक्रारी एप्रिल महिन्यात प्राप्त झाल्या होत्या.
हेही वाचा - कोरोनावर देशी दारुचा काढा, ५० रुग्णांना बरे केल्याचा दावा, आता डॉक्टरांनी केले घुमजाव
यानंतर सायबर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली पाठपुरावा केला. ही रक्कम ग्राहकांच्या खात्यात रिफंड करून घेतली.
सायबर पोलिसांचे आवाहन -
नागरिकांनी अनोळखी कॉल, मॅसेजेस, लिंक किंवा मी बँकेतून बोलत आहे, लॉटरी, बक्षिसे, फोने पे, कॅशबॅक, रिवार्ड, पेटीएम केवायसी, ऑनलाइन गेम यासाठी येणाऱ्या कॉल अथवा मॅसेजेसच्या अमिषाला बळी पडू नये आणि अशा कॉल व मॅसेजेसला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - पुण्यात आढळले म्युकरमायसोसिसचे २७० बाधित रुग्ण; उपचारांसाठी एसओपी तयार