जालना - डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात आलेल्या अंध दाम्पत्याने दोन लहान मुलासोबत संचारबंदीमुळे १०० किमीचा पायी प्रवास केला. समाधान सुरडकर आणि सुनिता सुरडकर असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी आपली दोन लहान मुले आणि पत्नीला घेऊन भोकरदन तालुक्यातील पारध या गावापर्यंत १०० किमीची पायपीट केली.
पारध येथील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले समाधान सुरडकर त्यांच्या कर्णबधीर पत्नीसह दोन मुलांना घेऊन जालना येथे डोळ्याची शास्रक्रिया करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले होते. तीन ते चार दिवस जालना येथे थांबल्यानंतरही उपचार झाले नाही. मात्र कोरोना विषाणूमुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डॉक्टरांनी त्यांना पंधरा दिवसानंतर शस्त्रक्रियेसाठी येण्यासाठी सांगितले. आता सुरडकर यांना संचारबंदीत घरी कसे जावे, असा प्रश्न त्यांना पडला. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने या दाम्पत्याचा जालना ते भोकरदन तालुक्यातील पारध असा १०० किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. त्यांनी आपल्या आठ आणि दहा वर्षाच्या मुलांना घेऊन आपल्या गावचा रस्ता धरला..