जालना - श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे उद्घाटन शुक्रवारी निर्मला रावसाहेब दानवे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, कारखान्याचे चेअरमन विजयसिंह परीहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिसरात मुबलक प्रमाणात ऊस नसल्यामुळे, गाळपासाठी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान साखर कारखान्यापुढे असल्याचे मत यावेळी रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. ते पुढे बोलताना म्हणाले की, कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस नाही. मात्र जे काही थोडे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांना त्यांचा ऊस दुसऱ्या कारखान्यावर नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली असती. हे लक्षात घेऊन हा साखर कारखाना सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत-जास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न
दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत आहे, गेल्यावर्षी कोरडा दुष्काळ होता. यावर्षी ओला दुष्काळ आहे. मात्र यावर्षी पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. यापुढेही ऊस लागवडीसाठी आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊ, शेतकऱ्यांचा ऊस घेण्याची आमची जबाबदारी आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा -मराठा आरक्षण आंदोलनात भाजपाचे षडयंत्र, आंदोलक समन्वयकांचा आरोप
हेही वाचा - सोलापुरात तुरीच्या शेतात पिकवला गांजा, शेतकऱ्याला अटक