जालना- जुना जालना परिसरातील जमुना नगर भागात घराच्या अंगणात उभ्या असलेल्या दुचाकी अज्ञाताने पेटवल्या. यात चार दुचाकी, दोन सायकल पूर्णत: जळाल्या आहेत, तर बाजूलाच असलेली कार घरमालकाने त्वरीत बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
जमुनानगर भागात उत्तम फुलचंद राठोड राहतात. त्यांच्या घरात लहान मुलांच्या सायकल, चौघांच्या दुचाकी, आणि एक कार पार्क करण्यात आली होती. सर्व वाहने इमारतीच्या आत होती. दरम्यान, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या दुचाकींना आग लावली. आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सर्व सदस्य घराबाहेर पडले. दुचाकींच्या बाजूलाच एक कारही उभी होती. मात्र, तत्काळ ती तेथून बाहेर काढल्याने अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, तर आग लागल्याने धावपळीत दोन महिला जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, सुरुवातीला शेजाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान येऊन आग विझवून गेले. शेजारील घरातील सीसीटीव्हीत घटना कैद झाली आहे.