जालना - आपत्तीच्या काळामध्ये सरकारने घालून दिलेले निर्बंध मोडीत काढत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या जनतेची कोरोना चाचणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे हे स्वतः रस्त्यावर उतरले.
हेही वाचा - दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातामध्ये दोन तरुण ठार
जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ती वाढू नये म्हणून शासनाने अनेक निर्बंध घातले, तरीदेखील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसतच आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी आता स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी शहरातील मामा चौकात एक तास स्वतः वाहतुकीला अडवून विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेतली.
पोलीस यंत्रणेची दमछाक
जिल्हाधिकारी स्वतः उभे राहिल्यामुळे पोलीस यंत्रणेची दमछाक झाली. अन्य वेळी कुठलाही धाक न दाखविता निवांत उभे असलेली पोलिस यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मात्र पटापट कामाला लागली आणि दुपार पर्यंत या चाचणीमधून रिकाम्या फिरणाऱ्या 3 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आणि उपस्थित असलेल्या पोलीस यंत्रणेला दिले. त्यासोबतच रोज वेगवेगळ्या ठिकाणी अशी तपासणी करणे बंधनकारकही करण्यात आल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे स्वतः रस्त्यावर उतरल्यामुळे आता पोलीस अधीक्षक विनायक देशमुख हे पोलीस यंत्रणेला काय सूचना देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण बहुतांश चौकांमध्ये पोलीस उभे असलेले दिसतात, मात्र ते केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा - जालन्यात चोरीच्या दारूची चढ्या भावाने विक्री, पोलिसांचा छापा