जालना- भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सध्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेमध्ये बबनराव लोणीकर यांचे देखील नाव घेतले जात आहे. याविषयी त्यांनी मात्र पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखविले आहे. मला काय वाटते यापेक्षा पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
लोणीकर म्हणाले, महाराष्ट्राच्या पहिल्या पाच खात्यांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा खाते आहे आणि या खात्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच मराठवाडा वॉटरग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे मी आणि माझे वरिष्ठ या कामात समाधानी आहोत. प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मिळून घेतील. ते जो आदेश देतील त्याचे स्वागतच आहे. मी राज्यात समाधानी आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्ती जर केली तर तो निर्णय देखील मान्य असेल असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावे लागणार आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन आदींची नावे असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.