जालना- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. रविवारी दिवसा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61 इतकी होती. मात्र, रात्री 10 अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे ही संख्या 71 वर जाऊन पोहोचली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे शनिवारी 106 संशयित रुग्णांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. रविवारी ते प्रयोगशाळेकडे पाठविल्यानंतर रात्री उशिरा या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जालना शहरातील जुना जालना भागातील एका खासगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या नूतन वाडी येथील दोन ,अंबड तालुक्यातील शिरनेर येथील एक, मंठा तालुक्यातील हनुमंत खेडा आणि कानडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. 10 रुग्णांपैकी सहा महिला व चार पुरुष आहेत.