जालना - राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवण्यासाठी केंद्रानेच पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात खूप निर्बंध कमी (Corona Restrictions) केले जातील. परिस्थिती बघून लागू असलेले सर्वच निर्बंध 100 टक्के कमी केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राज्यात सध्या दिवसाला दोन ते तीन हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना पूर्ण गेला नसला तरी रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.
- राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात -
मार्च महिन्यानंतरच राज्यात 100 टक्के अनलॉक केले जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी पूर्ण कमी झालेली नाही, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. निर्बंध कमी करण्यासाठी केंद्राचे पत्र राज्य सरकारला मिळाले असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
- निर्बंध शिथिलतेसाठी केंद्राचे राज्याला पत्र - टोपे
कोरोनाच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यात लागू केलेले निर्बंध ते आता कमी करू शकतात, असे पत्र केंद्रानेच राज्याला पाठवले आहे. राज्यात लसीकरण बऱ्यापैकी झाले असून, याचा परिणाम निर्बंध शिथिल करण्यावर होत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात आणखी निर्बंध शिथिल केले जातील. तसेच मुख्यमंत्र्यांचीसुद्धा अशीच सूचना आहे, असे टोपे यांनी सांगितले.