बदनापूर (जालना) - नांदेड - मनमाड रेल्वे मार्गावरील बदनापूर हे एकमेव तालुका रेल्वे स्टेशन वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित होते. मात्र, आता सोयी-सुविधांनी सुसज्ज होणार आहे. बदनापूर रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च 2021 पर्यंत हे स्थानक पूर्ण होण्याची शक्यता असून त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना देखील थांबा मिळण्याची शक्यता वाढली आहे. बदनापूर रेल्वे स्थानक सुरू झाल्यापासून विकासाच्या मार्गावर आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या. प्लॅटफॉर्मची उंची नसल्यामुळे वृद्ध, अपंगांना ट्रेनमध्ये चढ-उतारास मोठी अडचण व्हायची. मात्र, आता प्लॅटफॉर्मची उंची वाढविली जात आहे.
फुटओव्हर पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे नवीन प्लॅटफॉर्मवर छप्पर बांधण्याचे काम सुरू आहे. बदनापूर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, स्टेशन परिसरातील दिवे, रेल्वे कार्यांची माहिती, लाऊडस्पीकरवर काम करणं सुरू आहे. बदनापूर रेल्वे स्थानक मूलभूत सुविधांनी सुसज्ज असेल तर येथून प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. सुविधा नसल्यामुळे लोकांना जालना किंवा औरंगाबाद रेल्वे स्थानकात प्रवासासाठी जावे लागते.
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या थांबण्याची शक्यता -
विशेष म्हणजे, बदनापूर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ा थांबत नव्हत्या. आता स्टेशन-मूलभूत सुविधांनी सुसज्ज असताना मुंबई-हैदराबादकडे जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, देवगिरी एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेस, पुणे एक्स्प्रेस, हैदराबाद एक्सप्रेस, बंगळुरू एक्सप्रेस आणि इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
शहराच्या विकासाला चालना -
औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील बदनापूर हे एक व्यापारी केंद्र आहे. जिथे कृषी महाविद्यालय, यांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक क्षेत्रासाठी लोक मोठ्या संख्येने प्रवास करतात. रेल्वे स्थानकाच्या विकासकामांमुळे बदनापूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.