जळगाव - शहरातील शाहूनगरात राहणाऱ्या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली. प्रसाद सिद्धेश्वर जंगाळे (वय ३५, रा. शाहुनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. बेंडाळे चौकापासून काही अंतर पुढे असलेल्या एका सिमेंटच्या दुकानाबाहेर त्याच्यावर वार करण्यात आले. यानंतर जीव वाचवण्यासाठी पळाल्यामुळे या तरुणाच्या रक्ताने माखलेले पायांचे ठसे, रक्ताची धार रस्त्यावर उमटली होती. जेएमपी मार्केटमधील हॉटेल सवेराच्या समोर त्याचा मृतदेह सकाळी आढळून आला.
प्रसाद हा नवीन बी. जे. मार्केटमध्ये स्क्रीन प्रिंटिंगची कामे करीत होता. बुधवारी नेहमीप्रमाणे तो सायंकाळपर्यंत काही मित्रांच्या संपर्कात होता. यानंतर रात्री ९.३० वाजता त्याने बी. जे. मार्केटमधील एका मित्रास फोन केला. दोघे जण भेटणार असल्याचे ठरले होते. मात्र, त्यानंतर प्रसादचा मोबाईल बंद झाला होता. यानंतर गुरुवारी सकाळी जेएमपी मार्केटमधील हॉटेल सवेराच्या समोर त्याचा मृतदेह आढळून आला. हॉटेलमधील कर्मचारी, कचरा वेचणाऱ्या तरुणास हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यांनी सवेरा हॉटेलचे मालक हरभजन सिंग यांना कळवले. सिंह यांनी शहर पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.
हेही वाचा - नाशकातील दुगारवाडी धबधब्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रसादच्या खिशातील पाकीट तपासले असता आधारकार्ड मिळून आले. त्यानुसार प्रसादचा आतेभाऊ निखिल रवींद्र शेट्ये (वय २३, रा. शाहुनगर) याला घटनास्थळी बोलावून ओळख पटवण्यात आली. निखिल याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वार झाल्यानंतर जीवाच्या आकांताने पळाला प्रसाद -
मारेकऱ्याने प्रसाद याच्या छातीवर, डाव्या पायावर आणि कपाळावर चाकूचे वार केले आहे. कोंबडी बाजार परिसरातील एका सिमेंटच्या दुकानाबाहेर मुख्य रस्त्यावर प्रसादवर वार झाले. तेथे रक्ताची मोठी धार रस्त्यावर उमटली आहे. यानंतर प्रसादच्या डाव्या पाय पूर्णपणे रक्ताने माखलेला असल्याने पंजाचे ठसे रस्त्यावर उमटले आहे. वार वाचवण्यासाठी तो जीवाच्या आकांताने सुमारे १०० मीटर अंतर पळत गेल्याचे घटना स्थळावरील परिस्थितीवरून दिसत आहे. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे अखेर जेएमपी मार्केटमधील हॉटेल सवेराच्या बाहेर तो पालथा पडला. याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.
हेही वाचा - "खरी 'तुकडे तुकडे गँग' तुमचा आयटी सेल आहे", रेणुकाचे मोदींना 'थेट' उत्तर
कौटुंबिक कलहामुळे पत्नीपासून विभक्त राहात होता प्रसाद -
प्रसाद याचे लग्न झाले होते. मात्र, कौटुंबिक कलहामुळे तो पत्नीपासून विभक्त होता. या दाम्पत्यास आर्यन (वय ३) हा मुलगा आहे. प्रसादच्या कुटुंबात आई-वडील, लहान भाऊ सचिन व राणी, सोनी, वैशाली या 3 विवाहित बहिणी आहेत. पत्नीपासून विभक्त राहत असलेला प्रसाद हा तणावात राहत होता. मात्र, त्याचे कोणाशीही वैर नव्हते, अशी माहिती मिळाली. बी. जे. मार्केटमध्ये त्याचे अनेक मित्र होते. कोणाच्याही वादात नसलेल्या प्रसाद सोबत घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांसह मित्रांनाही धक्का बसला आहे.