जळगाव - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येवल्यात सुरक्षित अंतर ठेवून नियमांचे पालन करत उन्हाळ कांदा काढणीला वेग आला आहे. लॉकडाऊनमधून शेतकामांना सवलत दिल्यामुळे येवल्यातील शेतकरी व शेतमजूर शासकीय सूचनांचे पालन करत शेतीच्या कामात व्यग्र असल्याचे चित्र तालुक्यात बघण्यास मिळत आहे.
सध्या उन्हाळ कांदा काढणीस आला असल्याने शेतकरी व शेतमजूर कांदा काढताना दिसत आहे. सध्या कांद्याची आवक वाढली पण, बाजारभाव मात्र सातत्याने घसरत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अगोदरच कोरोना विषाणूमुळे शेतमालाला भाव नाही, त्यातच गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा ठेवून शेतकरी सध्या कांदा काढणीत व्यग्र असल्याचे चित्र येवला तालुक्यात पाहायला मिळत आहे.