जळगाव- तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विवाहित महिलेला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या विवाहितेसह अन्य दोन महिलांनी मृत तरुणाकडून लग्न करण्याच्या नावाखाली १ लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केली होती. फसवणूक झाल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.
उज्ज्वला गाढे (वय १८) असे अटक केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही महिला बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी आहे. ती पुण्यात एका व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने पुण्यातील रांजणगाव येथून उज्ज्वला गाढे हिला अटक केली आहे. तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर ती ४ महिन्यांपासून फरार होती.
हेही वाचा-पंढरपुरात प्रेयसीच्या हौसेसाठी मोटरसायकल चोरणाऱ्या मजनूला अटक
काय आहे नेमके प्रकरण?
मृत कैलास संतोष चवरे (रा. सामसोद, ता. जामनेर) हा तरुण एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करत होता. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील बहिणीकडे गेल्या १२ वर्षांपासून राहत होता. त्याचा घटस्फोट झालेला होता. दरम्यान, दुसरा विवाह करण्यासाठी त्याची आई, बहीण आणि मेहुणे हे त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. जळगाव शहरातील शनिमंदिराजवळ राहणारी लिलाबाई रामनारायण जोशी व उज्ज्वलाबाई उर्फ संगीताबाई रमेश पाटील यांनी कैलासच्या नातेवाईकांकडून एक लाख रूपये घेवून, ३० जुलै २०२० रोजी सकाळी मलकापूर येथील उज्ज्वला गाढे हिच्याशी त्याचे लग्न लावून दिले. त्याच ठिकाणी कैलास याच्या नातेवाईकांनी ४० हजार आणि ६० हजार असे दोन टप्प्यात १ लाख रूपये दिले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी नववधू उज्ज्वला गाढे कुसुंबा येथे आल्यानंतर कैलासचा मोबाईल घेवून पसार झाली. नैराश्यातून कैलासने ७ ऑगस्ट रोजी शनिमंदिराजवळील पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या ओट्यावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी २८ ऑगस्ट रोजी मयत कैलास चवरे याचे मेहुणे संतोष पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीनही महिलांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा-बारामतीत फोडली पाच दुकाने; चोरट्यांनी रकमेसह आईस्क्रीमही लांबवले
यापूर्वी दोघींना अटक-
या प्रकरणात यापूर्वी लिलाबाई जोशी व उज्ज्वला पाटील यांना अटक झाली होती. त्यानंतर उज्ज्वला गाढे हिला अटक झाली. ती पुण्यात एका व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल दिनेशसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने पुण्यातील रांजणगाव येथून उज्ज्वला गाढे हिला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, संशयित आरोपी असलेल्या उज्ज्वला गाढे हिने अजून अशाप्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का? याचा उलगडा पोलिसांच्या अधिक तपासात होईल, असे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.