जळगाव - पैसे घेऊन खोटे लग्न लावणे त्यानंतर पैसे, दागिने, कपडे असा ऐवज घेऊन पसार होणारी टोळी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या प्रकरणी नवरीसह तिचा मामा आणि मावशीला अटक करण्यात आली आहे. त्यांचे तीन साथीदार मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.
नवरी सोनू राजू शिंदे, तिची मावशी पूजा प्रताप साळवे (दोन्ही रा. सिद्धार्थ नगर, हिंगोली) आणि नवऱ्या मुलीचा मामा योगेश संजय साठे (रा. शिवसेना नगर, ता. अकोला) अशी या अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीने आतापर्यंत १३ जणांना अशा प्रकारे गंडा घातला असून गेल्या १५ दिवसात ते दुसरे लग्न लावणार होते.
काय आहे प्रकरण?
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे याचे सोनू शिंदेशी ६ मे रोजी लग्न झाले. १५ मे रोजी सोनू घरातून पळून गेली. १६ मे रोजी भूषणने शहादा पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची फिर्याद दिली. या घटनेचा तपास पोलीस करत होते. तपासादरम्यान सोनू २१ मे रोजी शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील एका तरुणाशी कपिलेश्वर मंदिरावर विवाह करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, शहादा पोलिसांनी मारवड पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. मारवड पोलीस लगेचच कपिलेश्वर मंदिरावर गेले. पण त्याठिकाणी कोरोनामुळे विवाह सोहळ्यांना बंदी असल्याचे कळले. म्हणून पोलीस पढावद येथे गेले. तेथे विवाह सोहळा सुरू असताना नवरी सोनूसह तिची मावशी व मामाला अटक केली. तिन्ही संशयित आरोपींना शहादा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तिघे पळून जाण्यात यशस्वी-
या कारवाई दरम्यान, सोनूची आई, भाऊ आणि लग्न जमवणारा दलाल असे तिन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सध्या पोलीस त्यांच्या मागावर असून शोध सुरू आहे.