जळगाव - भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (17 जून) रात्री पावणे अकराच्या सुमारास भुसावळ शहरापासून काही अंतरावर महामार्गावर घडली. मनीष सुरेशकुमार दरडा (वय 30) आणि रितेश सुरेशकुमार दरडा (वय 26) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
भरधाव डंपरने दिली दुचाकीला धडक -
मनीष आणि रितेश हे दोघे जण भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी होते. ते जळगावात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा व्यवसाय करत होते. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी जाण्यासाठी भुसावळला दुचाकीने निघाले होते. रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास साकेगाव ओलांडल्यानंतर महामार्गावरील ट्रॅक्टरच्या शो-रूमजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
एकाचा घटनास्थळी तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू-
या अपघातात मनीषचा घटनास्थळीच, तर रितेशचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती भुसावळात कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - भुसावळात डंपरने दुचाकीला उडवले; नातेवाईकाच्या लग्नाला जाताना बुलढाण्यातील दाम्पत्यावर काळाचा घाला