जळगाव- मध्यप्रदेशातून औरंगाबादला गव्हाची पोती भरून जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील महादेव तांड्याजवळ घडली. या घटनेत ट्रक तर जळून खाक झालाच. मात्र, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी ट्रकमधील गहू देखील चोरून नेला.
मध्यप्रदेशातील खंडवा येथून गहू भरून औरंगाबादला जाणाऱ्या (क्र. एमपी.१२ एच ०१९२) ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन अचानक आग लागली. ही बाब ट्रकच्या चालकाच्या लक्षात आली. त्याने ट्रक थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आली नाही. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेनंतर सकाळी ६ वाजेच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी ही घटना पाहिली. तोपर्यंत ट्रकच्या मागील भागाला आग लागलेली नव्हती. ट्रकजवळ फक्त चालक आणि क्लिनर दोघेच असल्याचे पाहून लोकांनी त्यांच्याशी अरेरावी करत गहू चोरून नेला.
जमावाकडून क्लिनरला मारहाण -
ट्रकमधून गहू चोरून नेण्यास विरोध केल्याने काही टवाळखोर तरुणांनी ट्रकच्या क्लिनरला मारहाण देखील केली. लोकांची अरेरावी पाहून चालक तसेच क्लिनरने गहू चोरणाऱ्यांना विरोध केला नाही. या घटनेसंदर्भात उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, संकटात सापडलेल्या ट्रकच्या चालकाला तसेच क्लिनरला मदतीचा हात देण्याचे सोडून लोकांनी गहू चोरून नेल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हेही वाचा- 'कोरोना'चा जळगावात शिरकाव नाही... नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण