जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये नव्याने 50 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 957 इतकी झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अलीकडे मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक 17 रुग्ण हे रावेर शहरात आढळले आहेत. त्या खालोखाल 7 रुग्ण हे पाचोरा शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव शहरासह भुसावळ शहरात तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. अमळनेर शहरात देखील 143 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील बोदवड तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून, संसर्ग थांबत नसल्याने जिल्हा प्रशासनाची कसोटी लागत आहे.
शुक्रवारी आलेल्या अहवालात जळगाव शहर 1, भुसावळ 4, चोपडा 3, पाचोरा 7, भडगाव 1, धरणगाव 1, यावल 6, एरंडोल 1, जामनेर 3, जळगाव ग्रामीण 1, रावेर 17, चाळीसगाव 4, मुक्ताईनगर 1 असे एकूण 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदर रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. मात्र, तरी देखील कोरोना आटोक्यात येत नसल्याने अडचणी कायम आहेत.
जळगाव शहर- 206
भुसावळ- 209
अमळनेर- 143
चोपडा- 49
पाचोरा- 35
भडगाव- 80
धरणगाव- 19
यावल- 38
एरंडोल- 18
जामनेर- 20
जळगाव ग्रामीण- 29
रावेर- 69
पारोळा- 19
चाळीसगाव- 12
मुक्ताईनगर- 8
इतर जिल्ह्यातील- 3
एकूण- 957