जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहर हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. नागरिकांची बेफिकिरी अन स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीसाठी कारणीभूत आहे. आठवडाभराच्या कालावधीतच अमळनेरात तब्बल 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही अमळनेरकरांना गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. आजही बाजारपेठेत खरेदीच्या नावाखाली अनावश्यक गर्दी होतच आहे. कॉलन्या तसेच उपनगरांमध्येही नागरिक गर्दी करतच आहेत. तरी प्रशासन कारवाई करत नाही.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 24 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यात एकट्या अमळनेरातील 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 8 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला तालुक्यातील मुंगसे येथील एका वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या महिलेची ट्रॅव्हल्स हिस्ट्री तपासली असता ती औरंगाबाद, मुंबईला जाऊन आलेली होती. त्यानंतर अमळनेर शहरातील साळीवाडा भागातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. या दाम्पत्याचा मुलगा पुण्याहून घरी आलेला होता. त्याच्यापासून दाम्पत्याला लागण झाल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दाम्पत्याला कोरोनासदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 18 एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात महिलेला श्वसनाचा त्रास अधिक होत असल्याने तिचा 19 एप्रिलला मृत्यू झाला होता. तोवर महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नव्हता. या महिलेला मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे कारण सांगून जळगाव महापालिकेने तसा मृत्यू दाखला देत मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला होता. तिच्या अंत्ययात्रेत अनेक नातेवाईक सहभागी झाले आणि पुढे अमळनेरवर कोरोनाचे संकट ओढवले. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांपैकी काहींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या दाम्पत्याच्या संपर्कातील 100 हून अधिक संशयित जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन आहेत. अद्यापही त्यातील काहींचे अहवाल येणे बाकी आहे, त्यामुळे अमळनेरात कोरोना बाधितांची संख्या अजून वाढण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे, स्थानिक प्रशासनानेही तत्काळ उपाययोजना न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. जिल्हाबंदी असताना देखील अमळनेरात पुणे, मुंबई तसेच सुरत अशा संक्रमित शहरांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक चोरी-छुपे दाखल झाले. अशा नागरिकांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. शहरात संसर्ग वाढल्यानंतर प्रशासन हादरले. त्यानंतर संक्रमित परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले, शहरात येणारे सर्व मार्ग सील करण्यात आले. परंतु, तोवर परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक प्रशासन लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करण्यात अपयशी ठरले आहे. अद्यापही संक्रमित परिसरात उपाययोजना होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
बाईट: डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव