जळगाव - आदिवासी भागात भेडसावणाऱ्या कुपोषणाचा प्रश्न आता शहरी भागातही डोके वर काढताना दिसत आहे. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एनआरसी (न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर) विभागात 8 ते 10 कुपोषित बालके उपचारासाठी दाखल असून त्यातील 3 ते 4 बालके ही जळगाव शहरातील आहेत. या सर्व बालकांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील कुपोषणाचा मुद्दा उपस्थित करून स्वकियांवरच शरसंधान साधले होते. त्यामुळे दुर्लक्षित असलेला कुपोषणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात सुमारे 1 हजार 715 कुपोषित बालके आहेत. त्यापैकी 200 बालके ही तीव्र कुपोषित आहेत. सकस पोषण आहार तसेच औषध उपचार देऊन या बालकांना सुदृढ करण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ज्या बालकांच्या प्रकृतीत तालुकास्तरावर उपचार केल्यानंतरही सुधारणा होत नाही, त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एनआरसी विभागात हलविण्यात येते.
सद्यस्थितीत या ठिकाणी 8 ते 10 कुपोषित बालके उपचारासाठी दाखल आहेत. मात्र, उपचारासाठी दाखल असलेल्या बालकांना एनआरसी सेंटरसाठी लागू असलेल्या सुविधा नियमावलीनुसार पुरवल्या जात नाहीत. बहुतांश आवश्यक सुविधा तर निर्माण केलेल्याच नाहीत. औषधोपचारासह डाळ खिचडी, दूध, बिस्किट असा आहार बालकांना दिला जातो. अशिक्षित आणि गरीब असलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र आपल्या मुलांवर चांगले उपचार होत असल्याचे समाधान दिसते. नाण्याच्या दुसऱ्या बाजूविषयी ते अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय अस्तित्वात असताना एनआरसी सेंटर रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र इमारतीत कार्यरत होते. परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय झाल्यानंतर एनआरसी सेंटर मुख्य इमारतीत असलेल्या बालरुग्ण विभागात स्थलांतरित करण्यात आले आहे. तर एनआरसी सेंटरच्या इमारतीत शरीररचनाशास्त्र विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. नियमानुसार कुपोषित बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना इतर रुग्णांचा संसर्ग होऊ नये, यासाठी एनआरसी सेंटरसाठी स्वतंत्र इमारत असायला हवी. मात्र ते बालरुग्ण विभागातच उभारण्यात आले आहे.
एनआरसीत दाखल कुपोषित बालकांवर औषधोपचार सुरू असताना त्यांच्यात मानसिक प्रसन्नता रहावी म्हणून एनआरसी सेंटरच्या खोल्यांमधील भिंतींना आकर्षक रंगरंगोटी असावी, भिंतींवर पशु-पक्षी व कार्टूनची लक्षवेधी चित्रे रेखाटलेली असावीत, बालकांच्या रक्त व वजन वाढीसाठी दूध, विविध फळे, शेंगदाणे व गूळ, डाळ खिचडी तसेच इतर पोषक आहार दररोज दिला पाहिजे, बालकांच्या देखरेखीसाठी पूर्णवेळ बालरोग तज्ञ नियुक्त केलेला असावा. मात्र जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एनआरसी सेंटरमध्ये औषधोपचार आणि मोजका पोषण आहार वगळला तर इतर सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छता, कुपोषित बालकांच्या पालकांसाठी आवश्यक असलेले समुपदेशन, वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शन कार्यशाळा यासारख्या बाबींचा तर थांगपत्ताच नाही. तरीपण, प्रशासन चांगल्या सुविधा पुरवत असल्याचा दावा करत आहे.
कुपोषणमुक्तीसाठी केंद्र व राज्य शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. आरोग्य यंत्रणेवर कोट्यवधी रुपयांचा निधी देखील खर्च केला जात आहे. परंतु कुपोषण मुक्तीसाठी स्थानिक पातळीवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामीण व शहरी आरोग्य यंत्रणेच्या चालढकलपणामुळे कुपोषणमुक्ती ही स्वप्नवतच ठरली आहे.