जळगाव - वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांपुढे 'मेडिकल वेस्ट'ची विल्हेवाट लावणे, ही मोठी समस्या असते. मात्र, या समस्येवर जळगाव शहरातील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. रेणू नवाल यांनी उपाय शोधून काढला आहे. दवाखान्यात वापरल्या जाणाऱ्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, कात्री, चिमटे, गोळ्या, एक्स-रे फिल्म यांचा वापर केल्यानंतर त्यापासून डॉ. नवाल यांनी शोभेच्या कलात्मक वस्तू बनवल्या आहेत. आपल्या उपक्रमापासून इतरांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांनी शेकडो वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते.
शहरातील भास्कर मार्केटजवळ डॉ. रेणू नवाल यांचे क्लिनिक आहे. गेली 35 वर्ष डॉ. रेणू नवाल या शहरात स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. क्लिनिक म्हटले की गोळ्या-औषधी, सलाईन, बाटल्या अशा वस्तू आल्याच. या वस्तूंचा वापर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, हे एकप्रकारचे दिव्य असते. त्यांना त्यांच्या क्लिनिकमध्ये निर्माण झालेल्या मेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावावी? ही समस्या नेहमीच भेडसावत होती. यामध्ये प्रामुख्याने सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, मास्क, हँडग्लोज, एक्स-रे फिल्म, ऑपरेशनसाठी लागणाऱ्या साहित्याची विल्हेवाट लावणे कठीण होते. या वस्तू फेकण्यापेक्षा आपण त्यांचा पुनर्वापर करू शकतो का? या विचारातून डॉ. नवाल यांनी पाऊल टाकले. त्यांच्यातील कलात्मकता जागृत झाल्याने त्यांनी या सर्व वस्तूंपासून कलात्मक साहित्य बनवणे सुरू केले. बघता बघता 25 वर्षांत त्यांनी आपल्या क्लिनिकमधील टाकाऊ वस्तूंपासून शेकडो कलात्मक वस्तूंची निर्मिती केली आहे.
क्लिनिकमधील टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांनी केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे त्यांच्या क्लिनिकमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक नागरिकांनी भेट देऊन डॉ. नवाल यांच्या कल्पकतेला दाद दिली. डॉक्टरच नव्हे तर सर्वांनी टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी शोभेची वस्तू बनवली, तर कचऱ्याची समस्या काहीअंशी कमी होऊ शकते. ही आता काळाची गरज झाली आहे, असेही डॉ. नवाल म्हणाल्या.