जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यभर शिवसेना आक्रमक झाली आहे. जळगावात शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी राणेंविरोधात शहरातील चौकात दोन डुकरे आणुन प्रतिकात्मक आंदोलनही केले.
राणेंविरोधात दोन तक्रारी
शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आणि माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी दोन स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी या तक्रारी दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मंगळवारी सकाळी जळगावात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात केली. महापौर जयश्री महाजन आणि माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी नारायण राणेंच्या विरोधात लेखी तक्रार यावेळी दिली. "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी" अशी मागणी यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी केली.
वरिष्ठांशी चर्चा करून गुन्हा दाखल करू - सहायक पोलीस अधीक्षक
शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्याच्या मागणीची तक्रार शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या विषयासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे चिंथा म्हणाले.
टॉवर चौकात डुकरे आणून आंदोलन
शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर शहरातील टॉवर चौकात दोन डुकरे आणून प्रतिकात्मक आंदोलन शिवसैनिकांनी केले. नारायण राणे व त्यांची दोन्ही मुले हे सातत्याने मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. म्हणून डुकरे आणून आम्ही राणेंच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले, अशी प्रतिक्रिया माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - नारायण राणेंना भाजपचा पूर्ण पाठिंबा - देवेंद्र फडणवीस