जळगाव - केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९’साठी जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अनोरे या गावाचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण ११ नोव्हेंबरला ऑनलाईन होणार आहे. देशपातळीवरील या पुरस्कारामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘राष्ट्रीय जल पुरस्कार-२०१९’साठी अनोरे गावाने प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्र राज्यातून असंख्य प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले होते. प्रस्तावांच्या छाननीअंती महाराष्ट्रातून अंतिम पाहणीसाठी अनोरे (ता. अमळनेर) व बोरवा बुद्रुक (जि. वाशिम) फक्त या दोन गावांची निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जलशक्ती मंत्रालय, भूमी जल बोर्डच्या वरिष्ठ वैज्ञानिक श्रीमती अथिरा (दिल्ली) यांनी अनोरे गावाला भेट देऊन जलसंधारण विषयक झालेल्या कामांची शेतात व गावात पाहणी केली होती. त्यांनी गावाने एकजुटीने केलेल्या सर्वच कामाचे कौतुक केले होते. पांझरा-माळण नदी जोड प्रकल्पासाठी ही प्रयत्न व्हावा, अशी मागणीही त्यावेळी गावकऱ्यांनी केली होती.
वॉटरकप स्पर्धेतही मानकरी:
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत अनोरे हे गाव राज्यात तिसरे तर उत्तर महाराष्ट्रात राज्यस्तर विजेते एकमेव गाव आहे. वॉटर कप स्पर्धेत जलसंधारण, मृदसंधारण, मन संधारणाची गावात अतिशय शास्त्रशुद्ध कामे झाली आहेत. बारामाही टॅंकर असणारे गाव आज टॅंकरमुक्त झाले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये छतावरील पावसाचे शंभर टक्के जमिनीत जिरवणारे अनोरे हे राज्यातील पहिले गाव आहे. प्रत्येक घरासमोर शोषखड्डे असल्यामुळे शंभर टक्के शोषखड्डे असणारे गाव झाले आहे. शेताची बांध बंदिस्ती व शेततळी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारण यांची कामे झाली आहेत.