जळगाव - जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. उशिरा का होईना, पण जिल्ह्यात पाऊसधारा बरसल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, पेरणीसाठी आणखी पावसाची प्रतीक्षा आहे.
जून महिना संपत आला आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात अद्यापही मान्सून हवा तसा सक्रिय झालेला नाही. शेतकऱ्यांसह नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागाला वादळी पावसाने झोडपले. रात्री मुक्ताईनगर, भुसावळ, फैजपूर तसेच अमळनेर तालुक्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. अमळनेर तालुक्यात पावसापूर्वी जोरदार वादळ होते. वादळामुळे ठिकठिकाणी वृक्ष तसेच विजेचे खांब कोसळले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रेही उडाले. मात्र, किरकोळ वित्तहानी सोडली तर सुदैवाने कोठेही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
सोमवारी पहाटेच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील धरणगाव, रावेर, यावल, पाचोरा, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, जामनेर तालुक्यात पावसाचे आगमन झाले. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसधारा बरसल्या. दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही पेरणी करता येईल, असा पाऊस पडलेला नाही. येत्या दोन दिवसात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेतजमिनीच्या मशागतीची कामे आधीच उरकून ठेवली आहेत.