जळगाव - जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना मुबलक प्रमाणात पीपीई किट उपलब्ध होत नाहीत. ही बाब माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ जिल्ह्यासाठी साडेतीन हजार पीपीई किट आणि ८ हजार लीटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.
मंगळवारी सायंकाळी गिरीश महाजन यांच्या जळगावातील जी.एम. फाऊंडेशन या कार्यालयात हे साहित्य आणण्यात आले. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूभाई पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य योगेश्वर गर्गे, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, भगत बालाणी, आबा कापसे, श्रीराम खटोड, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित निरामय सेवा संस्था, भारतीय जनता पक्ष आणि आ. गिरीश महाजन यांच्या जी.एम. फाऊंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यासाठी ३,५०० पीपीई किट आणि ८ हजार लीटर सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे १५०० किट देणार-
जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यकता असल्याने १५०० पीपीई किट आणि सॅनिटायझर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित सॅनिटायझर गावागावात देणार असून सार्वजनिक ठिकाणी ठेवणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.