जळगाव - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना पेढे व मिठाई भरवून जल्लोष साजरा करण्यात आला.
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचे निकाल आज समोर आले. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्य पातळीवरील ही पहिलीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवारांनी विजय मिळवला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या काळात महाविकास आघाडीला मिळालेला जनतेचा कौल महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. जळगावात या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जल्लोष साजरा करताना जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, वाल्मिक पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारवरील विश्वासाची प्रचिती- अॅड. रोहिणी खडसे
विरोधीपक्ष भाजपकडून महाविकास आघाडीचे सरकार पडेल, अशी टीका सातत्याने केली जात आहे. परंतु वर्षापूर्वीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. यामुळे जनतेचा महाविकास आघाडी सरकारवरील विश्वासाची प्रचिती येत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे अॅड. रोहिणी खडसे म्हणाल्या.
हा जनतेचा विश्वास आहे- अॅड. रवींद्र पाटील
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या शुभ मुहूर्तावर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. हा जनतेचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. रवींद्र पाटील यांनी दिली.
हेही वाचा- विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबिज
हेही वाचा- चौकशीसाठी 14 दिवसांचा वेळ द्या - प्रताप सरनाईक यांची ईडीकडे मागणी