जळगाव - जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीत भाजपचा महागोंधळ पाहायला मिळाला. अर्ज दाखल करताना झालेल्या चुकांमुळे भाजपने अधिकृतरित्या जाहीर केलेले उमेदवार स्पर्धेबाहेर पडले. मात्र, सुदैवाने भाजपच्याच उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चालून आलेली आयती संधी हुकली. अन्यथा भाजपवर मोठी नामुष्की ओढवण्याची भीती होती.
भाजपकडून दोन विषय समित्यांसाठी प्रत्येकी एक अर्ज भरणे अपेक्षित असताना एकाच समितीसाठी दोन अर्ज भरण्याचा गलथानपणा झाला. त्यातही भाजपच्याच एका सदस्याने बंडखोरी केल्याने दोन्ही अधिकृत उमेदवारांना माघार घ्यावी लागली. तर दुसऱ्या अन्य समितीत भाजपच्या नाराज सदस्यांनी बंड करून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, अधिकृत उमेदवाराने या समितीसाठी अर्ज सादर न करता विषय समिती एकचा अर्ज सादर केला. त्यामुळे बंडखोर उमेदवारामुळेच भाजपची इभ्रत वाचली. अन्यथा या समितीवर महाआघाडीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असता.
रवींद्र पाटलांच्या बंडाने प्रस्थापितांचा पत्ता कट -
विषय समिती क्रमांक १ साठी भाजपने मधुकर काटे यांच्या नावाची घोषणा केली होती, तर महाआघाडीने सुरेखा पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचेच साकळी-दहिगाव गटाचे सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांनी बंड पुकारत अर्ज दाखल केला. गोंधळात भर म्हणून की काय याच समिती क्रमांक १ मध्ये समिती क्रमांक २ साठी भाजपने दिलेले उमेदवार अमित देशमुख यांचा अर्ज भरला गेला. त्यामुळे रवींद्र पाटलांसाठी दोन्ही प्रस्थापित उमेदवार मधुकर काटे व अमित देशमुख यांची माघार घ्यावी लागली. यात बंडखोर रवींद्र पाटलांच्या पदरात सभापती पद पडले.
बंडखोरांनी वाचवली भाजपची इभ्रत -
विषय समिती क्रमांक २ मध्ये भाजपकडून माजीमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अमित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अर्ज भरताना त्यांनी विषय समिती १ साठी अर्ज भरला गेल्याने त्यांची यापूर्वीच माघार झाली. भाजपचे नाराज असलेले गजेंद्र सोनवणे व उज्ज्वला म्हाळके यांनी अर्ज केले होते. तेच अर्ज यावेळी कामी आले. यातून गजेंद्र सोनवणेंनी माघार घेतली. त्यामुळे उज्ज्वला म्हाळकेंच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. त्यांनी बंडखोरी केली नसती तर महाआघाडीच्या डॉ. नीलम पाटील बिनविरोध निवडून आल्या असत्या.
भाजपचे टायमिंग चुकल्याने 'ट्विस्ट' -
सभापतीपदाची वाटणी करताना तसेच उमेदवार ठरवताना भाजपत कालपासून बैठका सुरू होत्या. मात्र, उमेदवार निवडीच्या दिवसापर्यंत ठरले नव्हते. त्यातच आज सकाळपासून पदाच्या नावावर एकमत झाले नव्हते. शेवटी दुपारी साडेबाराला यादी फायनल झाली. घाईघाईत अर्ज सादर करण्याचा सोपस्कार करण्यात आला. मात्र, विषय समितीनुसार अर्ज सादर झाले नसल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसला. भाजपचे टायमिंग चुकल्याने सगळा गोंधळ उडाला. या गोंधळात बंडखोरांना लॉटरी लागली.