जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रक्षा खडसे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.
खासदार रक्षा खडसे यांची बुधवारी रात्री प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आपल्याला कोरोनाची लागण झाली असून, आपली प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण उपचार घेत असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, आपली काळजी घ्यावी, असे आवाहन रक्षा खडसे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत केले आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जयंत पाटील हे काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त त्यांनी जिल्ह्याचा दौरा करून ठिकठिकाणी सभा व आढावा बैठका घेतल्या होत्या. आता ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात शेकडो जण त्यांच्या संपर्कात आले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष केव्हा निवडणार? राज्यपालांचे राज्य सरकारला पत्र