जळगाव - येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षकाचा 'ऑन ड्युटी' मद्याचे पेग रिचवत असल्याचा व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार नेमका कधी आणि कोठे घडला आहे? याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.
नरेंद्र दहिवडे असे 'ऑन ड्युटी' मद्यशाळा भरवणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दहिवडे हे जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षकपदी कार्यरत आहेत. ते शहरातील एका मद्याच्या दुकानात मद्याचा साठा तसेच इतर बाबींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत असतानाच, बिअर पित असल्याचा हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार कुणीतरी आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात चित्रीत करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
संबंधित व्हिडीओत नरेंद्र दहिवडे हे शासकीय गणवेशात नाहीत. मात्र, ते मद्याचा साठा तपासत असल्याचे तेथे असणाऱ्या काही कागदपत्रांवरून समजते. म्हणजेच, दहिवडे हे ऑन ड्युटी असल्याचे स्पष्ट होत आहे. शनिवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षकपदावर कार्यरत व्यक्तीने केलेल्या अशा बेजबाबदार वर्तनाची अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी घेतील का? दहिवडे यांच्यावर काय कारवाई होते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: ग्राहकच नसल्याने कापड दुकाने ओस... व्यापारी हतबल
हेही वाचा - क्वारंटाइन होण्यास नकार देणाऱ्या १८ जणांवर गुन्हा; अमळनेरातील प्रकार