जळगाव - शहरातील भाजपाचे जिल्हा कार्यालय अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा प्रकार आज सकाळी उघड झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार एका माथेफिरुने केल्याचा संशय असून, शहर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जळगाव शहरातील बळीराम पेठेत भाजपाचे 'वसंत स्मृती' हे जिल्हा कार्यालय आहे. हे कार्यालय शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. या घटनेत कार्यालयाचा मुख्य दरवाजा पूर्णपणे जळाला आहे. आज सकाळी हा प्रकार समोर आला. या घटनेबाबत भाजपाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दरवाजासमोर कचरा जाळल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.
एक संशयित पोलिसांच्या ताब्यात -
हा प्रकार एका माथेफिरूने केल्याचा संशय आहे. मागच्या आठवड्यात भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीप्रसंगी या माथेफिरूने शिवीगाळ करत दगडफेकही केली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित असलेल्या माथेफिरुला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
माथेफिरू खडसे समर्थक?
दरम्यान, या घटनेत संशयित असलेला माथेफिरु हा एकनाथ खडसे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंनी भाजपा सोडल्यानंतर सुरू असलेल्या राजकीय वादातून त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.