जळगाव - केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा राज्यात तातडीने लागू करावा, अशी मागणी जळगाव भाजपाने केली आहे. या मागणीसाठी आज (बुधवारी) जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात प्रदेश किसान मोर्चा भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रशासनाला विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन सुधारित कायदा आणला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेती माल देशभरात कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. कंपन्यांना शेतमाल खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांशी करार करता येणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, केंद्र सरकारने हा कायदा लागू केल्याने त्याला विरोध म्हणून राज्य सरकारने कायदा लागू न करण्याचे आदेश काढले. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना दिलेल्या अधिकारांना हिरावण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे, असाही आरोप आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने हा कायदा राज्यात लागू करावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन -
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन सुधारित कृषी विधेयकांना मंजुरी दिली आहे. यानंतर राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी त्याला मंजुरी देऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र, केवळ राजकीय विरोध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकार या कायद्याला विरोध करत आहे. ही बाब योग्य नाही. राज्य सरकारच्या अशा भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. राज्यात हा कायदा लागू केला नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.