जळगाव - एकीकडे शेतकऱ्यांसाठी घोषणा करीत स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणारे राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम करीत असल्याने राज्य सरकारचा शेतकऱ्यांविषयीचा हा बेगडी कळवळला आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवारी केला.
सरकारविरोधात घोषणा
महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. याद्वारे जनतेला अंधारात टाकण्याचे काम राज्य सरकारच्यावतीने सुरू असल्याचा आरोप करीत महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी भाजपाच्यावतीने महावितरण केंद्रांवर ‘टाळा ठोको व हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये जळगावातही आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी आमदार भोळे यांनी राज्य सरकारवर वरील आरोप केला.
'आमच्या सरकारच्या काळात एकाही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला नाही'
राज्य सरकारच्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या धोरणाचा भाजपा निषेध करीत असल्याचे सांगत आमदार भोळे यांनी राज्य सरकारच्या दुहेरी धोरणावर टीका केली. राज्य सरकारला वेळीच जाग आली पाहिजे, यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांविषयी हे सरकार कळवळला दाखवित असले तरी आघाडीत बिघाडी झालेले हे सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करीत आहे. आमच्या सरकारच्या काळात एकाही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा आम्ही खंडित केला नाही, असा दावाही यावेळी आमदार भोळे यांनी केला.
कार्यालयाला आंदोलकांनी ठोकले टाळे
महावितरणच्या कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधातील तसेच वीजबिल माफ झालेच पाहिजे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी सरकारच्या निषेधाचे फलकही झळकविण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाला आंदोलकांनी टाळे ठोकले. ज्या भागात आकडे टाकले जातात तेथे जे ग्राहक वीज भरतात त्यांनाही खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार भोळे म्हणाले. इतरांच्या चुकांचा त्रास बिल भरणाऱ्यांनी का सहन करावा, असा सवाल या वेळी करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनावेळी आमदार भोळे यांच्यासह जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी,स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, नगरसेवक भगत बालाणी, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, सरिता नेरकर, रेखा कुलकर्णी, पार्वताबाई भील, डॉ. राधेश्याम चौधरी, जितेंद्र मराठे, विकी सोनार, रेखा वर्मा, प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.